Monday 17 January 2011

हे तुमचं काही खरं नाही गड्यांनो!

हे तुमचं काही खरं नाही गड्यांनो!
अरे काय म्हणावं काय तुमच्या या वागण्याला? आम्हाला तर काही कळेनासंच झालंय. कशावर कसं रीयक्ट व्हावं याचं काही ताळतंत्र आहे की नाही? अरे साधा कांदा तो काय आणि केवढी बोंबाबोंब सुरू आहे तुमची त्यावरून? त्याचा भाव काय वाढतो आणि त्यावर तुमचा थयथयाट काय सुरू होतो? हाच कांदा जेव्हा मातीमोल भावानं विकला जातो आणि शेतकरी वैतागानं, त्याला परवडत नसतानाही सारा कांदा फेकून देतो तेव्हा एकाला तरी आठवण येते का रे त्यांची? तेव्हा येते कोणाला चीड आणि रडतो का त्याच्यासाठी त्याच्यासोबत? तेव्हा त्याच्यासाठी तुम्ही सरकारवर ओरडला नाही मग आज त्याच्याकडून तरी कशी अपेक्षा ठेवता की त्यानं तुमचा विचार करावा याची? आणि खरा दोष त्याचाही नाहीच आहे. ते मधले दलाल, साठेबाज, कावेबाज व्यापारी लुबाडतात त्याला आणि तुम्हालाही पण त्याच्याविरूद्ध तुमच्या तोंडातून ब्र ही फुटत नाही. का बुवा असं? की तो शेतकरी गरीब, असंघटीत आहे म्हणून त्याच्यावर चढायचं आणि ते व्यापारी श्रीमंत, संघटीत म्हणून त्यांच्यापुढं शेपूट घालायचं? हे तुमचं काही खरं नाही गड्यांनो!
सोन्याचे भाव वाढले, चांदीचे भाव वाढले तेव्हा नाही राग आला तुम्हाला. मनात आनंदाच्या उकळ्याच फुटल्या उलट. कारण तुमच्या जवळंच ढीगभर सोनं होतं. मुलाच्या लग्नात आणखी ढीगभर मिळणारंच आहे. हुंडाबंदी गेली तेल लावत. तुम्हाला काय फरक पडतो? हे तुमचं काही खरं नाही गड्यांनो!
गाड्या महाग झाल्या, तरी गाडी घेण्याचा, चालवण्याचा सोस नाही कमी झाला. सायकल वापरावी, बसनं प्रवास करावा असं नाही कोणाला वाटलं कारण त्यानं तुमची प्रतिष्ठा डागाळते, तुमचं स्टेटस खराब होतं, मग भलेही शहरी वाहतुकीची आणि वातावरणाची वाट लागू दे. तुम्हाला कधीच काही वाटत नसतं. पण पेट्रोल महागलं की खच्चून बोंबाबोंब करायची एवढं बरं जमतं तुम्हाला. हे तुमचं काही खरं नाही गड्यांनो!
भ्रष्टाचार भ्रष्टाचार म्हणून मारे तुम्ही सर्वांवर तोंडसुख घेता, यांचं यंव करावं त्यंव करांवं असले फुकट सल्ले देत बसता. पण आपलं काम व्हावं म्हणून लाचही देता, वशिल्यानं इतरांचा हक्क डावलून आपलं घोडं दामटवता, आणि तरीही काम नाही झालं की लगेच भ्रष्टाचार भ्रष्टाचार म्हणून पुन्हा ओरडत फिरता ते कोणत्या नैतिक अधिकारानं? हे तुमचं काही खरं नाही गड्यांनो!
रस्त्यावरच्या भाजीवाल्याशी १-२ रूपयासाठी घासाघीस करता आणि कंपनी शोरूम्समध्ये विनातक्रार स्वतःला लुटू देता. फुटपाथवरले फेरीवाले जागा अडवतात म्हणून त्यांच्या मागे हात धुवून लागता आणि मोठाले बिल्डर्स मोठमोठाले भूखंड बळकावतात, खेळाची मैदानं घशात घालतात तेव्हा त्यांना तुम्ही जाब विचारत नाही. ट्रॅफीकला शिस्त नाही असं म्हणंतच तुम्हीही वनवेत गाडी घुसवता आणि ट्रॅफीक पोलिसानं पकडलं तर सरळ गुन्हा कबूल करण्याऐवजी फालतू कारणं सांगत हुज्जत घालता, मग पोलिसाला चिरीमिरी देऊन दंड टाळायला बघता , काम झालं की मित्रांमध्ये फुशारकी मारता आणि नाही झालं की पोलिस खात्याच्या तिर्थरूपांचा उद्धार करता. हे तुमचं काही खरं नाही गड्यांनो!
तुमची मोलकरीन एक दिवस नाही आली की तिला हवं ते बोलता, तिचा पगार कापता आणि ज्यांना चांगला राज्यकारभार करण्यासाठी तुम्ही निवडून दिलं ते राजकारणी वर्ष-वर्ष तुमच्या मतदारसंघात फिरकत नाही, फिरकले तरी तुमच्या समस्या ऐकून घेत नाही, तुमची कामं करत नाही, केली तर जी टिकत नाही , त्यांना मात्र कधी खडसावून दम देत नाही. उलट आपला स्वार्थ साधण्यासाठी त्यांचं लांगूलचालन करण्यात तुम्हाला कमीपणा वाटत नाही. हे तुमचं काही खरं नाही गड्यांनो!
अरे कधीतरी तुमच्या व इतरांच्याही हक्कांसाठी खमकी भूमिका घेऊन भांडा, राडेबाज राज-कारण्यांना चांगलं सत्ताकारण करण्यासाठी धमकवा, नाही ऐकलं तर घरी बसवा, कधीतरी आपल्या घराशिवाय, घरच्यांशिवाय गरजू, गरीब, असहाय लोकांचाही विचार करा, कधीतरी ‘मी’ न्याय्य मार्गानेच वागेन आणि इतरांनाही तसंच वागायला भाग पाडीन असा पवित्रा घ्या, कधीतरी भूकेल्याची भूक भागवा, तहानलेल्याची तहान शमवा, इतरांनाही जगायचं असतं, जे तुम्हाला हवंय, जी तुमची स्वप्ने असतात तीच इतरांचीही असतात ती पूर्ण करण्यासाठी त्यांना मदत करा, कधीतरी माणूस म्हणून जगा आणि इतरांनाही जगू द्या. नाहीतर शेजारचं घर जळताना, शेजारचा माणूस लुटला, भरडला जाताना गप्प बसाल तर तुमच्यावरही ती वेळ आल्यावर सारे गप्प बसून तुमचा तमाशा बघतील. मग तुमचं काही खरं नाही गड्यांनो!

No comments:

Post a Comment