Monday 3 January 2011

ह्या पुतळ्यामागं दडलंय काय !

“ पुतळ्यांना अधिकार नसतो संतप्त होण्याचा , भोवतालच्या व्यवहारात उतरण्याचा...”...”कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी आपल्या ‘ ज्योतीराव ‘ या कवितेत असं लिहिलं असलं तरी सध्या एका पुतळ्यावरूनच महाराष्ट्राचं, विशेषतः पुण्यनगरीचं वातावरण मात्र ढवळून निघालंय. ‘ पुणे तिथे काय उणे ‘ ह्या उक्तीला जागूण आता पुण्यातही इतर शहरातली राडा संस्कृती अवतरली आहे. आणि ती ही इतक्या प्रभावीपणे की ह्याही बाबतीत पुण्याकडेच आपोआप याचं पुढारीपण चालून येणार याविषयी आमच्या तरी मनात काही एक शंका नाही. एका पुतळ्यापायी लोकं अकारणंच संतप्त होताहेत आणि नको त्या व्यवहारात उतरून इतरांच्याही डोक्याला नको तो संताप देताहेत.पुण्यात गेले काही दिवस ठाण मांडून बसलेली थंडीही ह्याच गरमागरम वातावरणामुळेच आपला गाशा गुंडाळून गेली असंही एका थोर पुणेरी संशोधकानं सखोल संशोधन करून सिद्ध केलंय. एका पुतळ्यावरून सुरू झालेला हा अस्मितेचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वाद आता शिगेला पोहोचला आहे. पण एवढा राडा होऊनही सर्व पक्षिय राडेबाज अत्यंत दुःखी असल्याचे आम्हाला कळले. त्याची कारणमिमांसा ढुंढाळता काही आंतल्या गोटातल्या बातम्या आमच्या कानावर पडल्या. ‘आपणा जे जे ठावे ते ते इतरांस सांगावे, शहाणे करून सोडावे सकळजन ’, ह्या रामदासोक्तीचे आम्ही एकनिष्ठ पाईक असल्याकारणाने आम्ही ताबडतोब त्या गोष्टी तुमच्या कानावर घालायला हजर झालो आहोत. आम्हास ज्या महत्वाच्या गोष्टी कळल्या त्या अशाः- १) महाराष्ट्राची सांस्कृतीक राजधानी असूनही पुण्याचं नाव कुणाच्यातरी गेमपायी भलत्याच कारणासाठी गाजत असल्यानं, तिच्या चारित्र्यावरील हे डाग निपटून काढण्यासाठी, पुणे महानगरपालिकेतील सर्व पुणेहितचिंतक मंडळींनी एकत्र येऊन, स्वतःची बदनामी होईल याची पूर्ण कल्पना असूनही हे उदात्त कार्य केलं आहे. २) सतत वाढत्या भाववाढीनं त्रस्त सामान्य जनतेला कुठंतरी काहीतरी झपाट्यानं कमी होत आहे याचा आनंद व दिलासा मिळावा यासाठी अत्यंत खालच्या पातळीवरचं राजकारण करण्याचा धाडशी निर्णय या खासमखास मंडळींनी केवळ आम जनतेच्या भलाईसाठी घेतला पण लोकांनी उगाच त्यांना नावं ठेवली. ३) तोडफोड केल्याबद्दल आपल्यालाच नुकसान भरपाई द्यावी लागेल याची कल्पना असतानाही केवळ लोकहितासाठीच या जनसेवकांनी बसेस फोडल्या, मग जाळल्या. आता तुम्ही म्हणाल यात लोकहित काय साधलं गेलं. तर मंडळी मुळात या सर्व बसेस आधीच कामातून गेल्या होत्या. या निमित्तानं त्या फोडल्या गेल्यानं आता निदान त्यांच्या जागी नविन बसेस तरी येतील म्हणजे पर्यायानं पुणेकरांचाच फायदा नाही का होणार ? पण आपली ही उदात्त भावना कोणीच समजून घेतली नाही याचं सर्वांनाच अत्यंत दुःख होतंय. सर्वाच्या लाडक्या आबांनीच सांगून ठेवलंय, “ बडे बडे शहरोंमें ऐसी छोटी मोटी घटनाएँ होती रहती है. “ तरी पण लोकं काही त्यापासून शिकले नाही म्हणजे बघा. ४) महापालिकेत हैदोस घातला म्हणून सर्वांनी या गरीब गाईसारख्या सदस्यांना शिव्या घातल्या, अजूनही घालताहेत. पण त्यामागची त्यांची वैचारीक भूमिका मात्र कोणीच समजून घेतली नाही याचं सर्व सदस्यांना घोर आश्चर्य वाटतंय. महापौरांची खूर्चि तोडल्यानं महापौरांचा अवमान झाल्याचा आरोप यांच्यावर केला जातोय. पण ही खूर्चि जूनी झाली होती ती कधीही मोडली असती आणि त्यावरचे महापौरही खाली पडले असते तर ती केवढी नामुष्कीची बाब ठरली असती. म्हणून सर्व सदस्य , महापौरांना ती खूर्चि बदलायचा आग्रह धरला तर महापौरांनी त्यावर, आधीच मेट्रोचा खर्च वाढलाय त्यात आणखी हा खर्च कशाला म्हणत मोडता घालत होते. दोघांच्याही ह्या प्रेमळ आग्रहात अखेर हातातल्या खूर्चिचे बारा वाजले. पण त्यामुळे का होईना नव्या खूर्चिचा मार्ग प्रशस्त झालाय. पण हे मात्र कोणीच ऐकायला तयार नाही उलट नव्या खूर्चिला आता महापौरही नवा हवा अशी अफवा कोणीतरी सोडून दिलीय. म्हणजे बघा ! महापौरांचा राजदंड तोडला त्याचाही विपर्यास करण्यात आलाय. मुळात हा राजदंड राजेशाही व दंडूकेशाहीचं प्रच्छन्न रूप आहे आणि लोकशाहीत अशा गोष्टी कशा काय खपवून घ्यायच्या. म्हणून तोडला तो एवढंच. ५) आता हे सारं करायचं तर काही कारण असल्याशिवाय कसं करायचं म्हणून हा पुतळा मध्ये आणला गेला. पण त्यामागेही एक उदात्त ( पुन्हा ) हेतू होता. सध्या सर्वत्रच संशोधनाची भयंकर वानवा दिसत आहे. त्यातून आपल्या इतिहासाकडं तर सर्वाचाच दुर्लक्ष होतंय. आणि यात नव्या पुढीचं तर सर्वात जास्त प्रमाण आहे. ज्यांच्या खांद्यावर या देशाचं भवितव्य आहे त्यांनाच इतिहासाचं ज्ञान नाही ही किती भयंकर गोष्ट आहे बरं. कारण ज्याला इतिहास माहित नसतो त्याला इतिहास घडवताही येत नाही असं बाबासाहेबांनी सांगीतंलय. त्यामुळे या नव्या पिढीला बाबासाहेबांची ही शिकवण शिकवावी व त्यांना इतिहासाची गोडी वाटावी , तिकडे त्यांचं लक्ष जावं म्हणून सर्वानी हे ‘सुंदरकांड’ घडवलं. आता तुम्हीच बघा जो तो आपल्या इतिहासाबद्दल चर्चा करतोय. त्यातही यात दोन गट पडल्यानं नेमकं खरं काय याचा शोध घेण्यासाठी अनेकांनी इतिहास संशोधनास सुरूवातही केली आहे. त्यामुळे पुण्यात इतिहास संशोधन मंडळ, भांडारकर संस्था आहेत तसेच कित्येक थोर इतिहास संशोधकही कार्यरत असल्याची माहिती सर्वांनाच झाली आहे. त्यामुळे आपल्या इतिहासाविषयी सारेच जन जागृत झाले आहेत. अन् याच उदात्त ( पुन्हा ) हेतूसाठी हा सर्व राडा जाणूनबुजून घालण्यात आला होता.यातून इतरही गोष्टी साध्य झाल्या आहेत. यावरची आमची निरीक्षणं अशी आहेत. पहिलं म्हणजे दादोजी हे एक अत्यंत चमत्कारी पुरूष आहेत. ह्या कर्नाटकवासी व कन्नड भाषी माणसासाठी आज आपले मराठी भाषिकच सीमावाद विसरून आपापसात भांडताहेत, हा केवढा मोठा चमत्कार आहे, नाही ? दुसरं म्हणजे कधी नव्हे ते राज आणि उद्धव यांचं किमान एका मुद्द्यावर तरी एकमत झालंय. त्यामुळे ते पुन्हा एकत्र यावेत यासाठी विनाकारण प्रयत्न करणारे पुन्हा आपले रिकामपणचे उद्योग सुरू करू शकतील. तिसरं म्हणजे महापालिकेचे कर्मचारी सुस्त असतात, कामचुकार असतात असे जे आरोप त्यांच्यावर केले जातात ते यानिमित्ताने फोल ठरलेत. ज्या तत्परतेनं त्यांनी दादोजींना ( पुतळ्याला ) कापलं आणि हलवलं त्यामुळे खुद्द दादोजीही आश्चर्यचकीत झाले असं आम्हास कळलं आहे. चौथं म्हणजे या प्रकरणात आपण लक्ष घालणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी आधीच स्पष्ट केलंय. सीडब्ल्युजी, टुजी, भाजी, कांदा भजी या जी जीनं आधीच जिकीरीस आलेलं सत्ताधीश सरकार या दादोजी प्रकरणात असं न वागतं तर नवल.पण ते काही असो या राड्यामुळं अनेक इतिहास संशोधक सतराव्या शतकातून पुन्हा एकविसाव्या शतकात परतले आणि ते अजून जिवंत असल्याचा लोकांना पुरावा मिळाला. त्यांनाही या निमित्तानं थोडीफार प्रसिद्धी मिळाली आहे. हे ही नसे थोडके. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या निमित्तानं दादोजींना महापुरूष बनवण्याचं या सर्व इतिहासप्रेमी सर्वपक्षिय सदस्यांचं स्वप्नही एवितेवी पूर्ण झालं. कुसुमाग्रजांनी म्हटलंय,“ महापुरूष मरतात “ महापुरूष मरतात तेव्हा जागोजागचे संगमरवरी दगड जागे होतात आणि चौकातल्या शिल्पात त्यांचे आत्मे चिणून
त्यांना मारतात पुन्हा एकदा...बहुदा कायमचेच म्हणून – महापुरूषाला मरण असते दोनदा एकदा
शत्रूंकडून ....आणि नंतर भक्तांकडून...”
त्यामुळे बाकी काही होवो न होवो पण या राडा प्रकरणानं दादोजींवर आता महापुरूषाचा शिक्का बसलाय. कारण त्यांना आता शत्रूही आहेत आणि भक्तही.

No comments:

Post a Comment