Thursday 22 February 2018

आपण का द्वेष करतो?


मी माणूस म्हणून जन्माला आलोय. जाणीवपूर्वक नाही तर निव्वळ योगायोगाने. मी यासाठी कोणतेही कष्ट घेतले नाहीत. कोणतीही इच्छा मनी धरली नव्हती. मी उंदराच्या किंवा गरुडाच्या किंवा गांडूळाच्या किंवा आंब्याच्या किंवा एखाद्या विषाणूच्या जन्मालाही आलो असतो किंवा मी मुळात जन्मालाच आलो नसतो. मग माणसाच्या जन्मात हा अहंकार कसा येऊन चिकटला मला? मी इतरांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ कसा काय समजू लागलो? मी आज योगायोगानेच पुरष आहे, हिंदू आहे, भारतीय आहे, मराठी आहे पण मी इतर कोणीही असू शकलो असतो किंवा इतर कोठेही जन्माला येऊ शकलो असतो. मी पाकिस्तानी असू शकलो असतो किंवा आफ्रिकेतील एखाद्या अशा देशात जन्माला आलो असतो ज्याचं नावंही आज मला माहित नाही. मी बाईच्या जन्माला आलो असतो किंवा मी मुसलमान झालो असतो. मी दलित किंवा ब्राह्मण असू शकलो असतो. मी अपंग किंवा मतीमंद किंवा प्रतिभावंतही असू शकलो असतो किंवा नसतोही. मग जे केवळ योगायोगानं मिळालं आहे, जे मिळवण्यात आलेलं नाही त्याचा अभिमान मी का बाळगतो? मी स्वतःलाच योग्य, श्रेष्ठ किंवा तुच्छ का समजतो?मी त्यांच्यातलाही होऊ शकलो असतो आणि तसा झालो असतो तर कदाचीत मी तेव्हा, मी आज जो आहे त्याचा तिरस्कार केला असता. जे केवळ हास्यास्पद आहे, तकलादू आहे, त्यासाठी आम्ही सारेच का भांडतो? कशासाठी एकमेकांचा इतका द्वेष करतो? इतरांना अपमानीत करण्याची एकही संधी आम्ही वाया घालवत नाही. स्वतःला मिरवण्यासाठी आम्ही निर्लज्जपणे समर्थन करतो. का आणि कशासाठी?हे सारं किती काळ तर फक्त जोवर श्वास चालू आहे तोवरच ना? मी येण्याच्या आधी काही नव्हतं आणि मी गेल्यानंतर काही असणार नाही. हे काही गूढ रहस्य नाही. मग हा द्वेषभाव का आणि कशासाठी?

Sunday 28 May 2017

भाषा अभिमानाचे फुसके बार

माणसाला भाषा असतेच. ज्यांना ती नसते असे लोक आता दूर्मिळ झालेत. पण त्यांनाही चिन्हांची भाषा ही असतेच. भाषेशिवाय मानवी व्यवहाराचा पाया ढासळतो. आता ही भाषा एकतर आपल्याला आपण कोणत्या परिस्थितीत वाढतो त्यावरून तरी मिळते किंवा मग आपल्या आवडीनुसार आपण ती शिकून घेतो. यात एक भाषा असते मातृभाषा. आपल्याला ही जन्मजात लाभते आणि अपवाद वगळता आपण आपले आईबाप ज्या भाषेत बोलतात तिच भाषा बोलत असतो. या भाषेचा काही आपल्याला पर्याय नसतो. आपण आपल्या आईवडीलांना आधी वारंवार रितसर अर्ज करून काही ही भाषा मागून घेत नसतो की त्यासाठी काही कष्टही उपसलेले नसतात त्यामुळे या भाषेबाबत अभिमान बाळगण्याचं काही कारणच नाही. ज्यासाठी आपण काही मेहनत घेत नाही, जी भाषा आपल्याला केवळ योगायोगानं भेटलेली आहे तिच्याबाबतीत अभिमान बाळगावं असं काय आहे? पण तरीही तो अभिमान आपण बाळगतो. इतकंच नाही तर इतरांची भाषा कनिष्ठ आणि आपली भाषा तेवढी श्रेष्ठ हा अभिमानही त्यात मिसळलेला असतो. हे सारंच हास्यास्पद आहे. आपली मातृभाषा, मग ती जी काही असेल ती आपण शिकायलाच हवी, कारण त्यांतून आपण अधिक उत्तम पद्धतीनं विचार करू शकतो, इतरांशी संवाद साधू शकतो हा भाग आहेच पण ही बाब परिस्थितीवरही अवलंबून असते. उद्या एखादा मराठी माणूस आफ्रिकेत गेला, तिथंच राहिला तर शक्यता हीच आहे  की त्याची मुलं मराठीपेक्षा आफ्रिकन भाषा उत्तम पद्धतीने शिकेल आणि त्याच्यासाठी तेच योग्य राहील. व्यवहारात हेच घडताना दिसतं तरीही आपण भाषा अभिमानासारख्या गोष्टींमध्ये गुंतून राहतो. मराठी माणूस तसा दांभिकच म्हणायला पाहिजे. एकतर मराठीच्या नावानं बोलणारे  आपल्या भाषेबाबत किती आग्रही असतात हीच शंका आहे. आपल्या पोरांना मराठी शिकवण्यापेक्षा इंग्रजी शिकवण्याचा आग्रह धरणारे हेच लोक नसून सर्वसामान्य लोकही असतात कारण त्यांची साधी आशा असते की आपलं मुल इंग्रजी शिकलं तर त्याला पैसे कमावण्याच्या जास्त संधी मिळतील. यात चुकीचं काही नाही. चुकीचा आहे तो आपला अनाठायी आग्रह आणि लबाड भाषाभिमान. हा असला लबाडपणा करण्याऐवजी मुलांना हव्या त्या भाषा शिकू देणं, त्यासाठी प्रोत्साहित करणं ही आपली जबाबदारी असली पाहिजे. इंग्रजीच काय जमल्यास आणखीही एखादी भाषा शिकवण्यासाठी त्यांना मदत करा. पण त्याचबरोबर मराठी शिकवण्यासाठीही त्यांना प्रोत्साहित करा. पण त्यासाठी पालकांना प्रयत्न करावे लागतील. भाषेची गोडी लावण्यासाठी फार अवघड प्रयत्न करण्याची गरज नसते. रोजच्या जगण्यात हसतखेळत भाषा शिकता येते. त्यासाठी उगाच अभिमानाचा झेंडा नाचवण्याची गरज नसते. ते राजकारण्यांचं स्वार्थाचं राजकारण आहे. पण याचा अर्थ आपली जबाबदारी संपते असाही नाही. शेवटी मग ती मराठी असो, पंजाबी असो, हिब्रु असो, भाषा टिकवणं हे आपलं कर्तव्यच आहे. इस्त्रायली लोकांनी त्यांची हिब्रु भाषा मृतवत झाली असताना पुन्हा जीवंत केली. आपली भाषा काही मेलेली नाही. ती संकटातही नाही. पण त्या गैरसमजात राहूनही भागणार नाही. उलट ती आणखी सशक्त, आणखी जोमदार, आणखी जागतिक कशी बनेल यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. उगाच मराठीच्या नावानं गळे काढण्यापेक्षा या गोष्टी केल्या तरच मराठी टिकेल आणि वाढेलही. 

Saturday 27 May 2017

# अमित शहांच्या शाही थापा

मोदी सरकारनं तीन वर्षे पूर्ण केल्याचा प्रचंड आनंद झालेल्या भाजप अध्यक्ष अमित शहा यांची वक्तव्ये ऐकल्यानंतर आम्हाला अनेक साक्षात्कार घडले. शहा कृपेने झालेल्या या शक्तिपात स्वरुपी साक्षात्कारांची माहिती देणं हे आमचं कर्तव्य आहे. तर भक्तगणांनो आमचा जन्म २०१४ साली झाली असल्याचे आम्ही पुन्हा एकदा जाहिर करतो. आआधीची तारीख ही कॉंग्रेस नामे एका बिलंदर पक्षाची निव्वळ धूळफेक होती हे आमच्या आता लक्षात आलं आहे. कारण शहाच म्हणतात की गेल्या साठ वर्षांत या देशांत काहीच झालेलं नाही. २०१४ साली परम आदरणीय मोदीजी सत्तेवर आले तेव्हाच्या आनंदात इंग्रजांनी या देशाला न मागताच स्वातंत्र्य बहाल केलं. कॉंग्रेस आणि अन्य लोकांनी त्यासाठी जी लुटूपुटीची नाटकं केली ती आता शहांच्या कृपेनं आम्हाला कळली आहेत. मोदी सत्तेवर आले म्हणून सर्व जगानं भारताला जगाची महासत्ता म्हणून घोषित केलं. त्यांनीच आल्याआल्या प्राचीन भारतात, मोदी कधीतरी सत्तेवर येतील म्हणून तेव्हांच्या ऋषीमुनींनी जे शोध लावले होते, ते पटापटा प्रत्यक्षात साकारले गेले. वीज आली, रस्ते आले, अणुभट्ट्या आल्या, बस, रेल्वे आली, इंटरनेट आली, अन्नधान्याची समृद्धी आली, इतंकच नव्हे तर सवासों करोड भारतीयही गेल्या तीन वर्षांतच जन्माला आले. गेल्या तीन वर्षांत भारतानं जी प्रगती केली त्यासाठी युरोप अमेरिकेला शेकडो वर्षे घासावी लागली होती. पण मोदींनी ते एका चुटकीत करून दाखवलं. कॉग्रेसच्या खोटारड्या नेत्यांनी आम्हाला शाळेंत चुकीचा इतिहास शिकवला, त्यासाठी आम्ही त्यांचा खमन ढोकळा खाऊन पोटभरून निषेध करीत आहोत.


Thursday 25 May 2017

मराठी स्त्री कादंबरीकार

ही पोस्ट मी पुन्हा टाकतोय व सर्वांशी शेअर करतोय. त्यावर काही विधान करण्याआधी सर्वांना विनंती आहे की शांतपणे व कसलेही पूर्वग्रह मनात न ठेवता ही पोस्ट वाचा. मुख्य म्हणजे याला स्त्री विरूद्ध पुरूष असा रंग कृपया देऊ नका. मी दोघांनाही माणूसच मानतो व त्यामुळे त्यांच्यात बरेवाईट गुण असतात हेही मानतो. मराठी साहित्य व्यवहाराचा मी एक साक्षीदार व सहभागी आहे. त्यातील एका गोष्टीवरील ही माझी निरीक्षणे व अंदाज आहेत. ती योग्य व खरीच असतील किंवा असावीत असा काही आग्रह नाही. त्यात तुमच्याकडून कमीजास्त योग्य भर अपेक्षित आहे. आणि चर्चा झालीच तर ती एकांगी, पूर्वग्रहदूषित असू नये. यात कोणाला मोठं मानण्याचा किंवा कोणाला कमी लेखण्याचा भाग नाहीय. एका वस्तूस्थितीकडे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न आहे. ती तशी आहे किंवा नाही, यावर मतं अपेक्षित आहेत. ही पोस्ट लिहीताना मराठी समकालीन तरुण स्त्री कादंबरीकार (ज्या सध्या आहेत)यांची मला माहिती नाही असं कोणी समजू नये. त्यांपैकी अनेकांशी माझा परीचयही आहे. कोणाला खिजवण्यासाठी हे लिखाण केलेले नाही.
-    हारूकी मुराकामीचं स्पुतनिक स्वीटहार्ट सध्या वाचतोय. त्यातली कथा नायिका ही लिखाणाचा ध्यास घेतलेली व मुख्यतः कादंबरी लिहिण्यासाठी उत्सुक असलेली एक विशीतली मुलगी आहे. हारूकीच्या अनेक पुस्तकातील कथानायिका या वाचनाची व लिखाणाची आवड असलेल्या असतात. जपानमध्ये असलेली ही वास्तवता असेल असं यावरून मानायला हरकत नाही. जगातील अन्य भाषांतही महिला आणि त्यातही तरुण मुली ज्या प्रमाणात साहित्यात समरस असतात, त्या तुलनेत मराठीची स्थिती वाईटच दिसते. एक कवितेचा प्रकार सोडला तर अन्य साहित्य प्रकारांत आणि साहित्य व्यवहारात स्त्रियांचं प्रमाण आणि त्यातही तरुण मुलींचं प्रमाण नगण्यच दिसतं. कथा हा दुसरा प्रकार आहे ज्यात काही प्रमाणात काही जणी आढळतात. कादंबरीचा विषय निघाला की मात्र हे प्रमाण फारच कमी होतं. कविता महाजन, छाया महाजन, मोनिका गजेंद्रगडकर या काही महिला कादंबरीकारांची नावं इथं सांगता येतील. पण हे अपवाद म्हणावेत असा हा प्रकार आहे. तरुण मुली एकूणच साहित्याकडे, वाचनाकडे, लिखाणाकडे का वळत नाहीत?
माझी काही निरीक्षणं व अंदाज आहेत.
-    जगण्यातली मौज ज्या गोष्टीत आहे त्यात साहित्य येत नाही असा यांचा समज असावा.
-    साहित्य व्यवहार हे फक्त पुरूषांनीच करायच्या गोष्टी आहेत असे त्यांच्यावरचे संस्कार.
-    साहित्य हे काही करीअर होऊ शकत नाही, त्यामुळे त्यात वेळ कशाला वाया घालवायचा हा विचार. मुली या फार व्यवहारी असतात असं म्हणतात.
-    लिखाण आणि इथे कादंबरीचा विचार आहे म्हणून त्याविषयी, हा प्रकार शारिरीक, मानसिक व बौद्धिक दृष्ट्या दमछाक करणारा आहे म्हणून यात मुलींना (ज्या लिखाण करतात) फारसा रस नसतो.
-    लिखाण, वाचन हे त्यांना ग्लॅमरस वाटत नाही म्हणून. निदान जिथे मराठीचा संबंध येतो तिथे.
-    लग्न हाच बहुतेकींच्या आयुष्यातला सर्वांत महत्त्वाचा भाग असेल, ज्यात या गोष्टींना काही महत्त्व नसणे.

समाजातील अर्धी लोकसंख्या जर साहित्याविषयी इतकी उदासिन असेल तर आपल्या सांस्कृतिक व्यवहारात साहित्याला मुख्य स्थान मिळणं जरा अवघडच आहे. आणि हे तेव्हा, जेव्हा आपल्या इथे घरातली बाई, मग ती आई असेल किंवा पत्नी असेल, ही घरावर प्रभाव टाकणारी असते असं मानलं जातं. अर्थात ते खरंही आहे. आपल्या एकंदरीत साहित्य संस्कृतीतील ही महत्त्वाची बाब कायमच दूर्लक्षित राहिली आहे. इतकंच.

१- ससा आणि कासव

इसाप नीतित सांगितलेली ससा आणि कासव यांच्यातील शर्यतीची गोष्ट सर्वांनाच माहित असेल. लहानपणी ही गोष्ट ऐकायला मजा वाटते. पण मोठेपणीही तशी मजा येत असेल तर मात्र आपण केवळ वयानं, शरीरानं वाढलो, आपली बुद्धी अजून बालबुद्धीच आहे असं समजायला हरकत नाही. या कथेचं तात्पर्य सांगताना ससा आळशी होता म्हणून हरला आणि कासव मेहनती होता म्हणून जिंकला असं सांगण्यात येतात. व्यवहारात तसं कधीच होत नसतं. ससा एकवेळ कदाचित आपल्या आळसामुळे हरेलही पण तो नेहमीच हरणार नाही. कारण सारे ससे सर्वकाळ झोपत नाही. आणि कासवानं कितीही वेगानं धाव घेतली तरीही तो सशाला हरवू शकत नाही. कासवानं शर्यत जिंकली तरीही त्याला जो वेळ लागतो तो इतका मोठा असतो की त्याच्या या जिंकण्याला काहीच अर्थ उरत नाही. शंभर मिटरची शर्यत तुम्ही दोन तासांत पूर्ण केली म्हणून तुमचं कोणी कौतुक करणार आहे का? कोणीच करणार नाही. दुसरं म्हणजे मूळातच ही शर्यत विषम आहे. सशाची शर्यत एकतर दुस-या सशाशी किंवा हरिणाशी किंवा चित्त्याशी लावता येईल आणि कासवाची दुस-या कासवाशी किंवा गोगलगाईशी लावता येईल. ही कथा आळशी लोकांमध्ये थोडा उत्साह निर्माण करण्यासाठी आहे. त्यांना समाधान मिळावं यासाठी आहे. प्रत्यक्षात कासवासारखे मंद लोक कधीही सशासारख्या वेगवान लोकांना हरवू शकत नाही. तेव्हा अशा कथांवर विश्वास ठेवणं बंद करा. पण मग या कथेचा अर्थ काय घ्यायचा की त्याला अर्थच नाही? तसं नाही. या गोष्टीचं तात्पर्य हे की सशासारखे वेगवान व्हा आणि कासवासारखे टणक व्हा. कासवाची ताकद त्याच्या टणक कवचात आहे तर सशाची त्याच्या वेगात. या दोन्ही गोष्टी तुमच्या कामात येतील तेव्हा तुमची प्रगती अधिक वेगानं होईल आणि ती टिकूनही राहील. या कथेचा हाच खरा अर्थ आहे. 

Monday 24 January 2011

स्वरसूर्य मौनस्थ जाहला



भीमसेन जोशी गेले. पण जातांना त्यांच्या कंठातली अमृतमयी स्वर संजीवनी समस्तांना देऊन गेले. गेली साठ वर्षं हा स्वरमेघ वर्षत होता, अविरत, ज्यात सचैल न्हाऊन निघत होते देशोदेशीचे स्वर-भूकेले रसिक, टिपत होते रंध्रारंध्रात ते चांदणस्वर अधीर, आतूर होऊन. हे आता पुन्हा होणे नाही. स्वर-पंढरीचा हा वारकरी आता त्याच्या माहेरी गेला आहे, कायमचा.
जग बदलणारी माणसं वेडी असतात. ती आधी स्वतः वेडी होतात आणि मग जगाला वेड लावतात. स्वरांचं वेड लागून छोटा भीमसेनही नकळत्या वयातंच घर सोडून स्वरांच्या शोधात दाहीदीशा भटकला. तपस्या एका जागी मांड ठोकूनच केली जावू शकत नाही, पायाला भिंगरी लावून, इतस्तत फिरत, ज्ञानकण वेचतही केली जाऊ शकते. स्वर तपस्या. कंठातून हवा तो स्वर, हवा तेव्हा निघण्याची किमया आणि तो स्वर डोळ्यांनी प्रत्यक्ष बघता येण्याची तपस्या. कठोर परिश्रमांती भीमसेनांनी ही किमया साध्य केलीच.
ह्या नशिबाच्या गोष्टी असतात का? असाव्यात. अन्यथा असलं सुरेल वेड प्रत्येकाला कुठं लागतं? आणि मग या वेडात सर्वांनाच सामील करून घेण्याचं त्यांचं कसब. जे त्यांच्या सोबत वेडे झाले ते धन्य झाले. हे सुख, हा मान आता इतरांना कधीच मिळणार नाही. एका काळाचा हा अस्त आहे.
आमचं भाग्य की आम्ही त्यांना पाहिलं, ऐकलं. ह्या आठवणीही अत्यंत गर्भश्रीमंत अशा आहेत. स्वर गंधानं पुनीत आहेत. आणि सुदैवानं त्यांना कधीच मरण असणार नाही. भीमसेनांचा पहाडी स्वर यानंतरही आमच्या ह्रदयात मेघगर्जनेसारखा घुमत राहील. त्यांच्या धीरगंभीर चपल बोल-ताना आणि वीजेसारखे कडाडते आलाप यापुढेही आम्हाला रोमांचीत करतील. कारण स्वरांना मरण नसतं. ते अमर असतात. आणि हे भाग्य ज्यांच्या हातून आमच्या भाळावर रेखलं गेलं त्या भीमसेनजींनाही आमच्या लेखी कधीही मरण नाही.

Monday 17 January 2011

हे तुमचं काही खरं नाही गड्यांनो!

हे तुमचं काही खरं नाही गड्यांनो!
अरे काय म्हणावं काय तुमच्या या वागण्याला? आम्हाला तर काही कळेनासंच झालंय. कशावर कसं रीयक्ट व्हावं याचं काही ताळतंत्र आहे की नाही? अरे साधा कांदा तो काय आणि केवढी बोंबाबोंब सुरू आहे तुमची त्यावरून? त्याचा भाव काय वाढतो आणि त्यावर तुमचा थयथयाट काय सुरू होतो? हाच कांदा जेव्हा मातीमोल भावानं विकला जातो आणि शेतकरी वैतागानं, त्याला परवडत नसतानाही सारा कांदा फेकून देतो तेव्हा एकाला तरी आठवण येते का रे त्यांची? तेव्हा येते कोणाला चीड आणि रडतो का त्याच्यासाठी त्याच्यासोबत? तेव्हा त्याच्यासाठी तुम्ही सरकारवर ओरडला नाही मग आज त्याच्याकडून तरी कशी अपेक्षा ठेवता की त्यानं तुमचा विचार करावा याची? आणि खरा दोष त्याचाही नाहीच आहे. ते मधले दलाल, साठेबाज, कावेबाज व्यापारी लुबाडतात त्याला आणि तुम्हालाही पण त्याच्याविरूद्ध तुमच्या तोंडातून ब्र ही फुटत नाही. का बुवा असं? की तो शेतकरी गरीब, असंघटीत आहे म्हणून त्याच्यावर चढायचं आणि ते व्यापारी श्रीमंत, संघटीत म्हणून त्यांच्यापुढं शेपूट घालायचं? हे तुमचं काही खरं नाही गड्यांनो!
सोन्याचे भाव वाढले, चांदीचे भाव वाढले तेव्हा नाही राग आला तुम्हाला. मनात आनंदाच्या उकळ्याच फुटल्या उलट. कारण तुमच्या जवळंच ढीगभर सोनं होतं. मुलाच्या लग्नात आणखी ढीगभर मिळणारंच आहे. हुंडाबंदी गेली तेल लावत. तुम्हाला काय फरक पडतो? हे तुमचं काही खरं नाही गड्यांनो!
गाड्या महाग झाल्या, तरी गाडी घेण्याचा, चालवण्याचा सोस नाही कमी झाला. सायकल वापरावी, बसनं प्रवास करावा असं नाही कोणाला वाटलं कारण त्यानं तुमची प्रतिष्ठा डागाळते, तुमचं स्टेटस खराब होतं, मग भलेही शहरी वाहतुकीची आणि वातावरणाची वाट लागू दे. तुम्हाला कधीच काही वाटत नसतं. पण पेट्रोल महागलं की खच्चून बोंबाबोंब करायची एवढं बरं जमतं तुम्हाला. हे तुमचं काही खरं नाही गड्यांनो!
भ्रष्टाचार भ्रष्टाचार म्हणून मारे तुम्ही सर्वांवर तोंडसुख घेता, यांचं यंव करावं त्यंव करांवं असले फुकट सल्ले देत बसता. पण आपलं काम व्हावं म्हणून लाचही देता, वशिल्यानं इतरांचा हक्क डावलून आपलं घोडं दामटवता, आणि तरीही काम नाही झालं की लगेच भ्रष्टाचार भ्रष्टाचार म्हणून पुन्हा ओरडत फिरता ते कोणत्या नैतिक अधिकारानं? हे तुमचं काही खरं नाही गड्यांनो!
रस्त्यावरच्या भाजीवाल्याशी १-२ रूपयासाठी घासाघीस करता आणि कंपनी शोरूम्समध्ये विनातक्रार स्वतःला लुटू देता. फुटपाथवरले फेरीवाले जागा अडवतात म्हणून त्यांच्या मागे हात धुवून लागता आणि मोठाले बिल्डर्स मोठमोठाले भूखंड बळकावतात, खेळाची मैदानं घशात घालतात तेव्हा त्यांना तुम्ही जाब विचारत नाही. ट्रॅफीकला शिस्त नाही असं म्हणंतच तुम्हीही वनवेत गाडी घुसवता आणि ट्रॅफीक पोलिसानं पकडलं तर सरळ गुन्हा कबूल करण्याऐवजी फालतू कारणं सांगत हुज्जत घालता, मग पोलिसाला चिरीमिरी देऊन दंड टाळायला बघता , काम झालं की मित्रांमध्ये फुशारकी मारता आणि नाही झालं की पोलिस खात्याच्या तिर्थरूपांचा उद्धार करता. हे तुमचं काही खरं नाही गड्यांनो!
तुमची मोलकरीन एक दिवस नाही आली की तिला हवं ते बोलता, तिचा पगार कापता आणि ज्यांना चांगला राज्यकारभार करण्यासाठी तुम्ही निवडून दिलं ते राजकारणी वर्ष-वर्ष तुमच्या मतदारसंघात फिरकत नाही, फिरकले तरी तुमच्या समस्या ऐकून घेत नाही, तुमची कामं करत नाही, केली तर जी टिकत नाही , त्यांना मात्र कधी खडसावून दम देत नाही. उलट आपला स्वार्थ साधण्यासाठी त्यांचं लांगूलचालन करण्यात तुम्हाला कमीपणा वाटत नाही. हे तुमचं काही खरं नाही गड्यांनो!
अरे कधीतरी तुमच्या व इतरांच्याही हक्कांसाठी खमकी भूमिका घेऊन भांडा, राडेबाज राज-कारण्यांना चांगलं सत्ताकारण करण्यासाठी धमकवा, नाही ऐकलं तर घरी बसवा, कधीतरी आपल्या घराशिवाय, घरच्यांशिवाय गरजू, गरीब, असहाय लोकांचाही विचार करा, कधीतरी ‘मी’ न्याय्य मार्गानेच वागेन आणि इतरांनाही तसंच वागायला भाग पाडीन असा पवित्रा घ्या, कधीतरी भूकेल्याची भूक भागवा, तहानलेल्याची तहान शमवा, इतरांनाही जगायचं असतं, जे तुम्हाला हवंय, जी तुमची स्वप्ने असतात तीच इतरांचीही असतात ती पूर्ण करण्यासाठी त्यांना मदत करा, कधीतरी माणूस म्हणून जगा आणि इतरांनाही जगू द्या. नाहीतर शेजारचं घर जळताना, शेजारचा माणूस लुटला, भरडला जाताना गप्प बसाल तर तुमच्यावरही ती वेळ आल्यावर सारे गप्प बसून तुमचा तमाशा बघतील. मग तुमचं काही खरं नाही गड्यांनो!